बिडकीनमध्ये अनधिकृत बॅनरवर हातोडा

Foto
बिडकीन, (प्रतिनिधी) : बिडकिन येथे बेकायदा बॅनरबाजीवरून झालेल्या वादात तन्मय चोरमारे या १७ वर्षीय युवकाची शुक्रवारी हत्या झाली. यानंतर बिडकीन पोलिस आणि ग्रामपंचायतीने अनधिकृत बॅनरचे खांब होर्डिंगवर कारवाईचा बडगा उगारला. शासकीय विश्रामगृह, बसस्थानक परिसर, रस्त्यावरील सुमारे दहा ते पंधरा लोखंडी होर्डिंगचे खांब मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कापून काढले. बेकायदा बॅनर, होर्डिंग, जाहिराती, पाठ्या लावणाऱ्यांना नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे सपोनि. नीलेश शेळके यांनी सांगितले.

बिडकीन येथील शासकीय विश्रामगृहाच्या जागेवर अनेक वर्षापासून सर्व पक्षीय नेत्यांनी व काही स्वयंघोषित कार्यकर्त्यांनी बॅनर लावण्यासाठी ज्याची त्याची राखीव जागा करून ठेवली होती. याच जागेवरील बॅनरबाजीतून बिडकीन येथे गुरुवारी रात्री दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यात १७ वर्षीय युवक तन्मय चोरमारे याचा मृत्यू झाला. त्यामुळे ५ गावात तणाव निर्माण झाला होता. 

चौघांना पाच दिवसांची कोठडी : 
तन्मयचे मामा योगेश दाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री उशिरा बिडकीन पोलिस ठाण्यात ३० ते ३५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून ऋषिकेश ऊर्फ चिमण जाधव, राहुल ठाणगे, सागर ठाणगे, प्रदीप ठाणगे यांना अटक केली. अन्य एक संशयित संतोष ठाणगे हा जखमी असल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलिसांनी या रुग्णालयात कर्मचारी तैनात केला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या चौघांना शनिवारी न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.